डॉ. प्रकाश डी. जाधव हे लातूर जिल्हाच्या निलंगा तालुक्यातील असून सध्या अहमदनगर जिल्ह्यात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘मराठी’ विषयात एम.ए., नेट, सेट व पीएच.डी. अशा शैक्षणिक पदव्या मिळवल्या आहेत. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ते शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून वंचित, उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी सातत्याने काम करत आहेत.
त्यांच्या लेखनात ग्रामीण वास्तव, सामाजिक अडचणी आणि संघर्षातून उगम पावलेली सकारात्मक जीवनदृष्टी यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. त्यांच्या कादंबऱ्या व लेखनासाठी त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘प्रक्षोभ’ ही त्यांची आत्मकथनात्मक कादंबरी वाचकांना आशा, प्रेरणा आणि धैर्य देते.
The Literature Times: Dr. ‘प्रक्षोभ’ ही आत्मकथनात्मक कादंबरी अतिशय संवेदनशील आणि प्रेरणादायी आहे. ही कादंबरी लिहायची कल्पना आणि प्रेरणा आपल्याला नेमकी कुठून मिळाली? यामागे काही खास प्रसंग किंवा अनुभव होते का?
डॉ. प्रकाश डी. जाधव: नमस्कार madam .. ! ‘प्रक्षोभ’ ही माझी पाचवी कलाकृती आहे. यापूर्वी मी ललित व संशोधनात्म स्वरूपाचे लेखन केलेलं आहे. पण ‘प्रक्षोभ’ ही माझी महत्वाची कलाकृती आहे. मी अशा स्वरूपाचे लिहिण्याचा फार दिवसापासून प्रयत्न करीत होतो. मला गेल्यावर्षी फार तीव्रतेने जाणवले की आपण हे सगळ लिहून छापलं पाहिजे असं मला वाटल. आपण आपलं जीवन शांत आणि निश्चिंत होऊन जगत असतो. परंतु अशा जीवनात अशा घटना घडतात की आपणाला काही गोष्टी सांगावे असे वाटते. समाजातील अनेक प्रवृत्ती जेंव्हा आपणाला माणूस म्हणून आपले अस्तित्व मान्य केलं जात नाही, आपला माणूस म्हणून आपणाला मान्यता दिली जात नाही, आपणाला अपमान, तिरस्कार सहन करावा लागतो, तेंव्हा एका माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. तेंव्हा तो परखडपणे, प्रक्षोभक असं लिहू लागतो. बोलू लागतो. मला वरील बाबींची जाणीव झाली म्हणून मला हे सगळ सांगाव लागलं. माझ्या ‘प्रक्षोभ’ च्या मनोगतात मी याचा खुलासा केलेला आहे.
The Literature Times: आपल्या लहानपणीची पार्श्वभूमी ही आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या खूपच कठीण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीतही आपण शिक्षणाकडे कसे वळलात आणि त्या प्रवासातील कठीण क्षणांवर मात करताना आपले मनोबल कसे टिकवले?
डॉ. प्रकाश डी. जाधव: खरं तर माझा ज्या समाज घटकात जन्म झाला त्या समाजात शिक्षणातला ‘श’ सुद्धा माहीत नव्हत. मला शाळेत शिक्षणासाठी कोणी पाठवलं नाही. आमच्या गावापासून १५-२० किलोमीटर वर केळगाव आहे. त्या गावातील लमाण तांड्यावर एक आश्रम शाळा चालू झाली होती. त्या शाळेत मुलांची गरज होती. मास्तर लोक वाड्या वस्तीवर जाऊन या भटक्या विमुक्त लोकांना शाळेचे महत्त्व संजावून सांगत होते. पण ज्या समाजाच्या पोटाचा प्रश्न मिटवायला एक गाव सोडून दुसऱ्या गावी जावे लागते. त्यांना शिक्षणाच महत्त्व कसे कळणार ? आणि शिक्षण घेऊन उपयोग काय ? शिक्षण देण्याची इच्छा असली तरी भटकंती अवस्थेमुळे त्यांना त्यातून मार्ग सापडत नव्हते. त्यामुळे भटक्या – विमुक्त समाजातले लोक मुलांना शाळेत पाठवत नव्हते. शाळा चालू करणे आवश्यक होते. म्हणून आमचे लोक कामावर गेल्यावर शाळेतले शिक्षक एक भाड्याचा टेंपो करून वस्तीवर आले. आणि माझ्यासोबत चार पाच मुलांना पकडून शाळेत घेऊन गेले. पण शाळेत गेल्यावर आम्हाला खूप त्रास झाला. एका ठिकाणी बसण्याची सवय नव्हती. मराठी भाषा बोलता येत नव्हती. आमची खूप तारांबळ न्होत होती. पण मला आमच्या मुख्याध्यापक बाईचं मराठी बोलणे खूप भारी वाटू लागल. मी मनातल्यामनात मराठी बोलण्याचा निश्चय केला. हळू हळू शाळेत राहण्याची सवय होऊ लागली. मला वर्गात मास्तर लोकांचं लक्ष्य वेधून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मी वर्गात पहिला येण्याचा ठाम निश्चय केला. फार त्रास झाला. पण मला त्यात यश मिळू लागलं. आणि माझं मन शाळेत रमू लागलं. सोबतची मुल वेगवेगळ्या कारणामुळे शाळा सोडून गेले. मी मात्र टिकून राहिलो. आणि मी आज आपल्या समोर आहे.
The Literature Times: आपण एकाच वेळी शिक्षक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहात. ही सर्व भूमिका एकाच वेळी निभावताना आपण वेळेचे आणि ऊर्जेचे व्यवस्थापन कसे करता? यामागे आपली कार्यपद्धती किंवा तत्त्वज्ञान काय आहे?
डॉ. प्रकाश जाधव – मी काही खूप मोठा माणूस नाही. जीवनात अनेक समस्या आल्या. अनेकांचे अपमान, तिरस्कार सहन केलं. त्यातून मला माझं आत्मभान जागृत झालं. त्याचीच उर्जा मला लिहिण्यासाठी बळ देते. आपणाला ज्या समस्या आल्या, त्या इतर विद्यार्थ्यांना येऊ नये असे वाटते म्हणून मला एक चांगला शिक्षक म्हणून चांगल काम करण्याची प्रेरणा देते.
The Literature Times: ‘तिम्मा’ या आपल्या कादंबरीसह इतर पुस्तकेही समीक्षक आणि वाचकांनी चांगल्या प्रकारे स्वीकारली आहेत. आपले लेखनप्रवास कसा सुरू झाला? सुरुवातीला लेखन करताना कोणत्या अडचणी आल्या आणि त्या कशा सोडवल्यात?
डॉ. प्रकाश डी. जाधव: ‘ प्रक्षोभ’ ही माझी पाचवी साहित्यकृती आहे. ‘तिम्मा’ या कादंबरीने मला लेखक म्हणून मला ओळख निर्माण करून दिले. ‘तीम्माला अनेक पुरस्कार मिळाले. त्यांतर मी संशोधनात्म लिहू लागलो. माझे तीन ग्रंथ आहेत. त्यांनंतर मी ‘प्रक्षोभ’ ही माझी आत्मकथनात्मक कादंबरी आहे. मी ही जाणून बुजून लिहिलेली साहित्यकृती आहे. सुरुवातीपासून मला आत्मकथा हा प्रकार आवडतो. मी विद्यापीठात शिकत असताना अत्म्क्थानाने मला वेड लावलेलं होत. म्हणून मी पीएचडी ला ‘ मराठी आणि हिंदी दलित आत्मकथने : एक तौलनिक अभ्यास’ असा विषय निवडला. पण मला आत्मकथनाचा अभ्यास करताना एक या प्रकारातील अनेक बाबी लक्षात आले. आत्मकथा हा एक साहित्यप्रकार आहे. पण दलित साहित्यिकांनी आपल्या वेदना, अन्याय, अत्याचार यातून निर्माण झालेला विद्रोह हे मांडण्यासाठी फार खुबीने या प्रकाराचा वापर केलेला आहे. त्यातून त्यांचा हेतू सफल झालेला आहे. पण त्यात साहित्यमूल्य मात्र दिसत नाहीत. या गोष्टी माझ्या लक्षात आल्यामुळे मी आत्मकथनात्मक कादंबरी या फॉर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. दलित आत्मकथनात आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न ‘प्रक्षोभ’ करेल अशी अपेक्षा आहे. आणि काही प्रमाणात मी यशस्वी झालेलो आहे, हे ‘प्रक्षोभ’ वाचल्यानंतर आपल्या ध्यानात येईल. मला काय म्हणायचं आहे.
The Literature Times: साहित्य, विशेषतः ग्रामीण जीवनावर आधारित आत्मकथनात्मक साहित्य, समाजावर आणि नव्या पिढीवर कसा प्रभाव टाकतो, असे आपल्याला वाटते? अशा प्रकारच्या साहित्याचे भविष्यातील स्थान कसे असेल, याबाबत आपली मते काय आहेत?
डॉ. प्रकाश डी. जाधव: मराठी साहित्यात दलित आत्मकथनाने मराठी साहित्याला दिशा देण्याच कार्य केलेलं आहे. या साहित्यप्रवाहाने अनेक पिढ्याच जगने शब्द केलेलं आहे. या साहित्यप्रवाहातील आत्मकथनाने मराठी साहित्यातच नाही तर भारतीय साहित्यात क्रांती निर्माण करयचं कार्यव केलेलं आहे. सामाजिक क्षेत्रात याची दाखल घेतली गेली. या आत्मकथनाचं प्रभाव १९६० ते ९० च्या दरम्यान समाजामनावर खूप मोठा प्रभाव निर्माण केलेला होता. पण हळू हळू दलित आत्मकथनला मरगळ येऊ लागली. मी दलित आत्मकथनाचा अभ्यासक म्हणून मला ते प्रकर्षाने जाणवू लागले. माझा यावर मोठा पीएचडी theshis उपलब्ध आहे. यावर मी तीन पुस्तके लिहिलेली आहेत. त्यात या सर्व बाबींचा आढावा घेतलेला आहे. या सर्व गोष्टी लक्षात आल्यामुळे मी नवीन पद्धतीने ‘प्रक्षोभ’ लिहिलेलं आहे. मला विश्वास आहे. माझ्या या ‘प्रक्षोभ’ मुळे आत्मकथनाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची दृष्टी देईल असे मला वाटते.
The Literature Times: आपण वंचित, गरीब आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सातत्याने कार्यरत आहात. या कार्याची सुरुवात कशी झाली आणि आजपर्यंत या कार्यातून आपल्याला कोणते महत्त्वाचे अनुभव आणि शिकवण मिळाली आहे?
डॉ. प्रकाश डी. जाधव: यासंदर्भात मी खूप सविस्तर लिहिणार आहे. ‘प्रक्षोभ’ च्या दुसऱ्या भागात या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपणाला मिळणार आहे. मला माझं हे सस्पेन्स तसच राहू द्या. सगळ्या गोष्टी मी इथे सांगितले तर माझ्या दुसऱ्या भागाचं सस्पेन्स संपून जाईल. धन्यवाद .. !
The Literature Times: आपल्या लेखनात दलित साहित्य, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार, आणि सामाजिक वास्तव यांचा मोठा प्रभाव दिसतो. या प्रभावांचा आपल्या विचारसरणीवर आणि साहित्यावर नेमका काय परिणाम झाला आहे?
डॉ. प्रकाश डी. जाधव: दलित साहित्याच्या प्रेरणा फक्त अण्णाभाऊ साठेच नाहीत तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले हे सुद्धा आहेत. माझ्या लेखनात या सर्वांच्या कार्यांचा आणि लेखनाचा प्रभाव आणि परिणाम आहे. या सर्व महामानवांना मी आपली प्रेरणा समजतो. या प्रेरणेतूनच दलित साहित्य निर्माण झालेलं आहे. मी ही याचं विचारसरणीचा पाईक आहे. त्याच विचारसरणीचा प्रसार आणि प्रचार करणे हे माझ्या शिक्षकी पेशातून करत असतो, तसेच साहित्यातून सुद्धा करत असतो.
The Literature Times: आजच्या बदलत्या समाजव्यवस्थेत, शिक्षण आणि साहित्य या दोन्ही गोष्टींमध्ये आपण कोणत्या महत्त्वाच्या बदलांची गरज पाहता? विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आपण कोणते उपाय सुचवाल?
डॉ. प्रकाश डी. जाधव: आजची समाजव्यवस्था जातीय मानसिकतेत जास्त अडकलेली दिसते. बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हणतात, ‘जात नाही ती जात’ या जाती नष्ट झाल्या पाहिजेत. यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करीत आहोत, पण त्या नष्ट होण्याऐवजी त्या मजबूत होत आहेत. हे आजच्या समाजव्यवस्थेची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.. शिक्षक आणि साहित्यकांची भूमिका फार महत्वपूर्ण आहे. ही व्यवस्था बद्ण्यासाठी. त्यांना काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागणार आहे. त्यांनी लिहिलं पाहिजे. बोलल पाहिजे. राजकीय लोकांना यात फायदा दिसतो. त्यांना समाजात ‘फोडा आणि राज्य करायचं.’ ते त्याचं हित पाहतात. त्यांची ती वोट बँक आहे. तेंव्हा शिक्षकांची आणि लेखकांवर मोठी जबाबदारी आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थांमध्ये मोठी उर्जा आहे. त्यांनी आपल्या गरिबीच्या आणि ग्रामीणत्वच्या न्यूनगंडातून बाहेर पडून आपले ध्येय सध्या करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपले आई वडील आपल्यासाठी किती मेहनत घेतात, आपले जीवन सुखी व्हावे यासाठी स्वप्न पाहतात. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत केली पाहिजे असे मला वाटते.
The Literature Times: ‘प्रक्षोभ’ या कादंबरीला वाचकांचा कसा प्रतिसाद मिळाला? विशेषतः ग्रामीण भागातील आणि शहरातील वाचकांमध्ये आपले अनुभव वाचताना काय वेगळी प्रतिक्रिया आली??
डॉ. प्रकाश डी. जाधव: ‘ प्रक्षोभ’ येऊन जास्त दिवस झाले नाहीत. मार्च महिन्यात आलेले आहे. तरी सुद्धा खूप वाचक वाचतायत. त्यावर प्रतिक्रिया देत आहे. मला सांगायला आनंद होत आहे की , दोन महिन्यातच एक आवृत्ती संपलेली आहे. अजून मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. मला असं वाटत दलित साहित्याला आलेली मरगळ दूर करण्यात ‘ प्रक्षोभ’ नक्कीच यश मिळवेल. दलित आत्मकथनाकडे पाहण्याची दृष्टी यामुळे बदलेले याची मला खात्री आहे.
The Literature Times: आजच्या पिढीतील नवोदित लेखक, विद्यार्थ्यांना किंवा संघर्षमय परिस्थितीतून वाटचाल करणाऱ्यांना आपण कोणता संदेश किंवा सल्ला द्याल, जो त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल?
डॉ. प्रकाश डी. जाधव: नवोदित लेखकांना मी विनंती करतो की, आपणाला जे वाटत ते लिहित रहा. मी साहित्याचा अभ्यासक मला मला एका गोष्टीच फार वाटत आहे की, आजकाल अनेक जन साहित्य लिहित आहेत, त्याचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक माध्यमांचा वापर करत आहेत. त्यांनी ते केलं पाहिजे. पण पैसे देऊन पुरस्कार विकत घेतात. आणि माझीच साहित्यकृती चांगली आहे. हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न करतात. मला हे सार काही बर वाटत नाही. मी त्याचं साहित्याचं वाचन केलं तेंव्हा त्यात शून्य साहित्यमूल्य आढळले. मला फार वाईट वाटल. त्यामागील कारणाचा शोध घेला तेंव्हा मला जाणवलं की, आपणाला लिहायचं आहे म्हणून लिहितात. तसं त्यांनी केलाच पाहिजे. परंतु चांगल्या साहित्यकृतीच वाचन ही केलं पाहिजे. चांगल ऐकल पाहिजे. तेंव्हाच चांगल लिहिता येत. आपला दृष्टीकोन व्यापक होतो. ती व्यापकता आपल्या साहित्यात अवतरते. असं मला वाटत. मी पुन्हा एकदा सांगेन माझं ‘ प्रक्षोभ’ ही आत्मकथनात्मक कादंबरी वाचा तेंव्हा आपल्या अनेक प्रश्नाच उत्तर त्यात मिळतील याची मला खात्री आहे.
धन्यवाद ….!